मराठी चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध अभिनेता अमोल कोल्हे यांच्या शिवप्रताप-गरुडझेप या ऐतिहासिक चित्रपटाची प्रेक्षक वाट बघत आहेत. या चित्रपटामध्ये अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. गरुडझेप हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दोन टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आले असून खूप पसंती मिळाली आहे. आता या चित्रपटातील बम बम भोले हे गाणं रिलीज झालं आहे.
अमोल कोल्हे यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर बम बम भोले या गाण्याची झलक शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं वेरूळच्या घृष्णेश्वराला, रायगडच्या जगदीश्वराला नमन करून आपल्या शिवप्रताप – गरुडझेप सिनेमाचं पहिलं गाणं खास आपल्यासाठी शिवरुद्राला वंदन करून सादर करत आहोत शिवप्रताप गरुडझेप मधील पहिलं गाणं बम बम भोले. ऋषीकेश परांजपेने गण्याचे गीतकार केले आहे तर शशांक पोवार यांनी गाण्याला संगीत दिले आहे आणि प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी हे गाणे गायले आहे. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर हे पूर्ण गाणं शेअर केले आहे. या गाण्याला लाइक व कमेंट्स करुन प्रेक्षकांची मोठ्या संख्येने पसंती मिळत आहे.

कार्तिक राजाराम केंढे यांनी गरुडझेप या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. व चित्रपटाची निर्मिती ही अमोल कोल्हे यांनी केली आहे. तसेच हा चित्रपट जगदंब क्रिएशन प्रस्तुत असणार आहे. सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अजून या चित्रपटाची रिलीज तारिख जाहीर करण्यात आली नाही.