हॉटेलसारखा मोकळा भात हवाय? मोकळा भात बनवण्याकरता वापरा या तीन स्टेप्स..!

0
657
hotel-sarkha-bhaat-rice-making-steps-rice-like-hotel

आपण बरेचदा हॉटेलमध्ये जेवताना भात अॉर्डर करतो. मग ती बिर्याणी असो किंवा पुलाव किंवा असो जिरा राईस!! हॉटेलमधील भाताच्या सर्व रेसिपीमध्ये भात कसा मोकळा आणि दानेदार दिसतो ना??
मात्र घरी स्वयंपाक करताना जेव्हा आपण कुकरमध्ये भात बनवत असतो, अनेक प्रयत्न करून देखील हॉटेलसारखा मोकळा भात काही करता येत नाही!

काही गृहिणींना मोकळा भात बनवण्याचे टेक्निक जमते. हॉटेलसारखा  मोकळा सुटसुटीत भात बनवावा, ज्यात तांदळाचा प्रत्येक दाणा वेगळा दिसावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते! अनेकदा प्रयत्न करून कधी भातामध्ये पाणी जास्त होते तर कधी तांदूळच चिटकून बसतो. कधी-कधी तर खिचडीच होते!

बऱ्याचशा लोकांना मोकळा भात करता येत नाही. हॉटेलमध्ये मिळणारा भाताचा कोणताही प्रकार अगदी मस्त का वाटतो?  हॉटेलचे कुक काय स्टेप वापरत असतील?   असे आपल्याला नेहमीच प्रश्न पडतात!

आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे हॉटेल सारखा मोकळा भात बनवण्याची रेसिपी सांगाणार आहोत.
चला तर जाणून घेऊया कसा बनवायचा मोकळा भात!

स्टेप 1-
मोकळा भात बनवण्याकरता आपण जे तांदूळ घ्याल ते तांदूळ नळाच्या पाण्याखाली तीन वेळेस स्वच्छ धुऊन घ्या. तांदूळ धुताना पाण्याचा पांढरा रंग पूर्णपणे निघून गेला पाहिजे. यानंतर दोन वेळेस पिण्याच्या पाण्याने तांदूळ धुऊन घ्या. आपल्याला इथे तांदूळ भिजत ठेवायचा नाही. किंवा तसाच तासनतास पडू द्यायचा नाही.
स्टेप 2-
भात करताना कधीही कुकरमध्ये भात करू नये. त्यामुळे भाताचे खडे बनतात किंवा भाताचा गाळ होतो. मोकळा भात बनवण्याकरता आपण कढई किंवा मोठे पातेले घेऊ शकता.  कढई किंवा पातेले घेऊन त्यामध्ये एक चमचा तेल टाका. फोडणीकरता खडे मसाले ज्यात तेजपत्ता, मोठी विलायची, दोन लवंगा, दोन काळीमिरी आणि जिर्‍याची फोडणी घाला.

मसाले चांगले तडकल्यानंतर त्यामध्ये एक वाटी पाणी घाला. इथे आपल्याला मसाले वापरायचे नसतील तर आपण ही स्टेप स्किप करा. मसाले टाकले नाही तरी चालेल. आता या पाण्यामध्ये एक चमचा मीठ टाका.

 स्टेप 3-
धुतलेले तांदूळ या पाण्यामध्ये टाका आणि अजून वरतुन दोन वाट्या पाणी घाला. लक्षात ठेवा जेवढे आपण तांदूळ घेऊ त्याच्या तिप्पट पाणी वापरायचे. आता झाकणाने कढई किंवा पातेले झाकून ठेवा.  फुल गॅस करून एक उकळी येऊ द्या. एक उकळी आल्यावर गॅस अगदी मंद ठेवा. सात ते आठ मिनिटे गॅस मंद करुन भात शिजु द्या. सात ते आठ मिनिटांनंतर गॅस बंद करा. गॅस बंद केल्यानंतर लगेच भातावरचे झाकण काढू नका. बरेच लोक ही चूक करतात व भाताचा गाळ होतो!

कारण भाताची वरची लेयर शिजलेली असते मात्र खालची बाजू शिजलेली नसते. याकरता झाकण लगेच काढायची नाही. जवळपास पंधरा मिनिटे झाकण तसेच ठेवून द्या ज्यामुळे वाफ आतल्या भाताला मोकळे करेल. पंधरा मिनिटानंतर झाकण उघडून बघा. आपल्याला अगदी मोकळा सुटसुटीत भात तयार दिसेल!

ज्याचा प्रत्येक दाणा एकमेकापासून वेगळा असेल!
आहे की नाही सोपी पद्धत ?? तर आता ही रेसिपी वापरून आपण मोकळा भात घरच्याघरी बनवू शकता!

Leave a Reply