“स्वराज्यरक्षक संभाजी’ ही झी मराठी वाहिनीवरील मालिका खूप कमी कालावधीत लोकप्रिय झाली. यात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घडामोडी, अनेक खडतर प्रसंग यावर प्रकाश टाकत इतिहास प्रेक्षकांसमोर आणण्याचे काम या मालिकेने केले. मालिकेत डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका प्रचंड ताकदीने निभावण्यात यशस्वी झाले. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.

संभाजी राजांचा पराक्रम आणि बुद्धीचातुर्य प्रेक्षकांनी या मालिकेतून जाणून घेतले. प्रेक्षक अजूनही या मालिकेच्या प्रेमात आहेत . त्यांना ही मालिका संपावी असे कधीच वाटत नव्हते. तर या प्रेक्षकांसाठी खुशखबर आहे ती म्हणजे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून १ मे पासून मे महिन्यातील प्रत्येक रविवारी छत्रपती संभाजी मालिका चित्रपट स्वरूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपट स्वरूपात ही मालिका प्रत्येक रविवारी प्रेक्षकांच्या दुपारी 12 वाजता भेटीला येणार आहे.
यानिमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा छत्रपती संभाजी राजांचा इतिहास पाहायला मिळणार आहे.लॉकडाउनच्या काळात रामायण, महाभारत या ऐतिहासिक मालिकांसोबतच स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिकासुद्धा प्रेक्षकांसाठी प्रसारित करण्यात आली होती.
