मनोरंजन विश्वात अविरतपणे १३ वर्षांपेक्षा अधिक काळ मनोरंजन करणारी लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ला एक मोठी चूक महागात पडली आहे. या मालिकेने कायम प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. ही मालिका अबालवृद्धांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. मात्र एका चुकीमुळे या मालिकेने प्रेक्षकांची नाराजी ओढवून घेतली आहे. त्यामुळे आता या मालिकेच्या निर्मिती टीमला चक्क प्रेक्षकांची माफी मागावी लागली. मालिकेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट करत झालेल्या चुकीसाठी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
— Taarak Mehta Ka Ooltah Chashmah (@TMKOC_NTF) April 25, 2022
काय आहे प्रकरण?
या मालिकेत असा प्रसंग दाखविला आहे की बाबूजी हे जेठालाल आणि बागा यांना ए मेरे वतन के लोगो या गाण्याची माहिती देत असतात. यावेळी त्यांनी या गाण जेव्हा प्रदर्शित झालेलं वर्ष चुकीचं सांगितलं. त्यामुळे नेटकऱ्यांनी या मालिकेवर टीकेची झोड उठवली. या भागात ए मेरे वतन के लोगो हे गाणं १९६५ मध्ये प्रदर्शित झालं असं सांगण्यात आलं होतं. मात्र, प्रत्यक्षात हे गाणं, भारत चीन युध्दाच्या वेळी म्हणजे १९६२ मध्ये भारतीय जवानांच्या त्यागासाठी कवी प्रदीप यांनी लिहिलं होतं. आणि हे गाणं दिवंगत गायिका लता मंगेशकर यांनी १९६३ साली गायलं. त्यावेळी हे गाणं ऐकल्यावर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे डोळे पाणावले होते. हाच प्रसंग सांगत असताना मालिकेत गाण्याच्या प्रदर्शनाचं वर्ष चुकीचं सांगण्यात आलं. ज्यामुळे नेटकऱ्यांनी या मालिकेला ट्रोल केलं. यांनतर निर्मिती टीमने मालिकेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट करत झालेल्या चुकीसाठी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
