‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या जगभरात चर्चा होत आहे. काश्मीर फाईल्सबाबत प्रेक्षकांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. कोण या चित्रपटाच्या बाबतीत सकारात्मक बोलत आहेत तर काही जण नकारात्मक बोलत आहेत. कश्मीर फाइल्स प्रदर्शित करण्यात आलेली बहुतेक चित्रपटगृहे हाऊसफुल्ल आहेत. लोकांना हा चित्रपट हाऊसफुल असल्यामुळे बघता येत नाहीय, त्यामुळे लोकं ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहण्यासाठी पर्यायी माध्यमाच्या शोधात आहेत.

देशातील अनेक राज्यांमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ या चर्चेनंतर आता या चित्रपटाने बोगस हॅकर्सचे लक्ष वेधले आहे. तुमच्या मोबाईलवर ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) चित्रपट पाहण्यासाठी कोणतीही लिंक आली असेल तर तुम्हाला त्यावर काळजीपूर्वक क्लिक करावे लागेल. द काश्मीर फाइल्स चित्रपट पाहण्यासाठी सोशल मीडिया साइट्वर विविध लिंक्स पाठवण्यात येत आहेत. यातील बहुतांश लिंक्स देशाच्या विविध राज्यातील हॅकर्सकडून सातत्याने पाठवल्या जात आहेत. खासकरून अशा लिंक वॉट्सॲपवरून मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जात आहेत.
काश्मीर फाइल्स चित्रपटाची लिंक ओपन केल्यास हॅकर्स तुमचे बँक खाते हॅक करू शकतात, त्यामुळे मोबाईलवर येणाऱ्या अशा लिंक्स ओपन करण्यापूर्वी वापरकर्त्यांनी काळजी घेणे अवश्यक आहे. देशातील अनेक भागातील पोलिस अधिकाऱ्यांनीही याबाबत लोकांना अलर्ट जारी केला आहे.
नोएडा येथील एका पोलिस अधिकाऱ्यांनी मंगळवारी लोकांना सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर अज्ञात लोकांकडून पाठवलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करण्यापासून सावध केले. अधिकारी म्हणाले की, सायबर गुन्हेगार लोकप्रिय चित्रपटाची लिंक पाठवून विनामूल्य पाहण्याच्या बहाण्याने लिंक पाठवू शकतात. अलीकडेच २४ तासांत एकाच पोलिस ठाण्यात तीन जणांच्या सायबर फसवणुकीच्या तक्रारी आल्या आहेत. ज्यामध्ये त्यांचे ३० लाखांचे नुकसान झाले आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.